बेंगळुरू आणि बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला १०० वर्षांचा इतिहास लाभलेला ‘गांधी कट्टा’ आज प्रशासकीय दुर्लक्षामुळे आपले अस्तित्व गमावत आहे.

१९२० च्या सुमारास खिलाफत चळवळ आणि स्वातंत्र्यसंग्राम प्रसारासाठी महात्मा गांधी चिकोडी दौऱ्यावर आले होते. त्यांनी याच कट्ट्यावर उभे राहून ब्रिटिशांविरुद्ध भाषण केले होते. गांधीजींच्या त्या आवाहनाने प्रेरित होऊन चिकोडीतील शेकडो तरुणांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती. त्या स्मृती प्रित्यर्थ या जागेला ‘गांधी कट्टा’ असे नाव देण्यात आले. मात्र, हा ऐतिहासिक वारसा आज दुरवस्थेच्या छायेत आहे.

एकेकाळी अत्यंत उंच असलेला हा कट्टा रस्तेकामाच्या नावाखाली आता अवघ्या एक फुटावर आला आहे. भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर, माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या सभांचाही हा कट्टा साक्षीदार राहिला आहे. परंतु, सध्या येथे मद्यपी व गांजाप्रेमींचा वावर वाढला असून स्थानिक नगरपालिका व तालुका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी गांधी जयंतीला केवळ भाषणे दिली जातात; परंतु तरुण पिढीला या इतिहासाची माहितीच नाही. सरकारने या जागेची दुरुस्ती करून त्वरित याला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे, अन्यथा येत्या दिवसांत तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा स्थानिक नागरिक रवींद्र बोरगावे यांनी दिला.
स्वातंत्र्यलढ्याची ज्योत पेटवणारा चिकोडीचा गांधी कट्टा आज प्रशासनाच्या अनावस्थेचा बळी ठरत आहे. या ऐतिहासिक स्मारकाचे पुनरुज्जीवन करून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जातो की हे स्मारक इतिहासाच्या पानात जमा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
डी. के. उप्पार, इन न्यूज, चिकोडी


Recent Comments