Belagavi

बेळगावात मतदार यादी पुनरीक्षणावरून राजकीय वाद पेटला

Share

कर्नाटकात मतदार यादी पुनरीक्षणावरून सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. बेळगावात अल्पसंख्याक मतदारांची नावे वगळण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला होता. यावर बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांनी जोरदार पलटवार करत मुख्यमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.

आमदार अभय पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटून अल्पसंख्याक मतदारांची नावे हटवण्याचे पत्र दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना बूथ स्तरावरील अधिकारी (BLO) आणि निवडणूक आयोगाच्या नियमांचे प्राथमिक ज्ञानही नसावे हे दुर्दैवी आहे.

आपण कोणत्याही विशिष्ट समुदायाची नावे वगळण्याची मागणी केलेली नाही, असे स्पष्ट करत आमदार पाटील म्हणाले की, बीएलओंच्या अधिकृत अहवालानुसार नियमबाह्य पद्धतीने नाव नोंदवलेल्या बोगस मतदारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती. राज्य सरकार बोगस मतदारांना तसेच बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस सरकारच्या दबावामुळे मतदार यादी पुनरीक्षणाचे काम विस्कळीत झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी चुकीचे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य त्वरित मागे घेऊन जनतेची माफी मागावी, अशी मागणी आमदार अभय पाटील यांनी केली आहे.

Tags: