ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानसभेत त्यांचा गौरव केला जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना सभागृहात अधिकृतपणे सत्कार व गौरव करण्याचा कार्यक्रम होता. मात्र या महत्त्वाच्या प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बहुतांश मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. या गोष्टीची गंभीर दखल घेत विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि उपनेते अरविंद बेल्लद यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. अनंत नाग यांच्यासारख्या दिग्गज कलावंताचा हा स्पष्ट अनादर असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पेमेंट घेतलेले बाहेर जावेत आणि पेमेंट न घेतलेले सभागृहात बसावेत असा टोला लगावला. यावर सत्ताधाऱ्यांनी आम्ही कोणाकडून पेमेंट घेतले आहे हे सिद्ध करा असे आव्हान देत सभागृह त्यागाचा इशारा दिला.
मंत्र्यांची अनुपस्थिती आणि दोन्ही बाजूंच्या तीव्र वादा मुळे सभागृहातील वातावरण तापले. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज तातडीने १० मिनिटांसाठी तहकूब केले.


Recent Comments