State

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची मंगळूर किनाऱ्याला अचानक भेट

Share

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सकाळी ६ वाजताच मंगळूर किनाऱ्याला अचानक भेट देऊन पाहणी केली आणि स्थानिक मासेमारांच्या समस्या जाणून घेतल्या.

नौकेतून प्रवास करत मुख्यमंत्र्यांनी किनाऱ्याची पाहणी केली. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळ काढण्याचा प्रश्न, नवीन डॉकची उभारणी आणि चॅनेल मार्किंगबाबत मासेमार संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

आपल्या भेटीदरम्यान किनारपट्टीवरील व्यापार बंद ठेवल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मासेमार आणि व्यापाऱ्यांचे नुकसान करणारी ही बाब असून, यामागे दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले.

या वेळी परिसरातील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच मासेमार समुदायाच्या प्रगतीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे, सागरी मेट्रो आणि पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या टीकेला उत्तर देताना, मी मांसाहार सोडल्याला अनेक वर्षे झाली आहेत, विरोधकांना विकासाचे राजकारण नको आहे, असा टोला त्यांनी लगावला.

याशिवाय तुळू भाषेला दुसरा प्रशासकीय दर्जा देण्याचा निर्णय स्थानिक जनतेच्या आकांक्षेचा मान राखण्यासाठी घेतला असून, कस्तुरीरंगन अहवालाबाबत जनतेचे मत जाणून घेऊनच सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: