शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या उद्देशाने मी थेट तुमच्या दारात आलो आहे. कस्तुरीरंगन अहवालाच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेण्यासाठी आणि सर्वसामान्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सोमवारपासून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.


शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी येथे आयोजित कस्तुरीरंगन अहवालावरील चर्चा सत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कस्तुरीरंगन अहवालावर केंद्र सरकारकडे आक्षेप नोंदवण्यासाठी २७ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे केवळ मंत्रिमंडळ किंवा अधिकाऱ्यांच्या पातळीवर निर्णय न घेता, मलेनाड भागातील नागरिक, शेतकरी आणि सर्व लोकप्रतिनिधींशी संवाद साधूनच अंतिम भूमिका मांडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे हित आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.


या सोहळ्याला मंत्री रामलिंगा रेड्डी, मधाू बंगारप्पा, खासदार बी. वाय. राघवेंद्र, आमदार बेळूर गोपाळकृष्ण, अरगा ज्ञानेंद्र, शारदा पुर्यानाईक, एस. एन. चन्नबसप्पा, विधान परिषद सदस्य बल्कीस बानू, धनंजय सर्जी, डी. एस. अरुण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments