Belagavi

बसवतत्त्वे मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेणार नाही: डॉ. एस. एम. जामदार

Share

जगातील लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. एस. एम. जामदार यांनी बसवेश्वरांचे विचार जगभरात पोहोचवण्याला पाठिंबा दर्शवत, त्यात कोणतीही मोडतोड झाल्यास सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस आणि निवृत्त सनदी अधिकारी डॉ. एस. एम. जामदार यांनी ‘बसव भारत’ मोहीम आणि आगामी लिंगायत जनगणनेच्या रूपरेषेची माहिती दिली. भाजप नेते अमित शाह यांनी उद्घाटन केलेल्या ‘बसव भारत’ मोहिमेला आमचा विरोध नाही, मात्र या कार्यक्रमाच्या नावाखाली बसवतत्त्वांची मोडतोड करून हिंदुत्वाचे मुद्दे समाविष्ट करण्याचा किंवा मठांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच बसवेश्वरांच्या वचनांवर आधारित लिंगायत धर्मात १६ विविध संस्कार असून ते वैदिक संस्कारांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत, असे डॉ. एस. एम. जामदार यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या पाच राज्यांमध्ये लिंगायत जनगणना आणि जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान चालणाऱ्या या २८ दिवसांच्या मोहिमेत लिंगायत समाजातील लोकांनी आपली जात आणि धर्म अचूक नोंदवावा, यासाठी घरोघरी जाऊन जागृती केली जाणार आहे. जनगणनेच्या अर्जात स्पष्टता मिळेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे सांगत लिंगायत आचार-विचारांची शुद्धता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘लिंगायत धर्माच्या परंपरा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्याचे डॉ. एस. एम. जामदार यांनी सांगितले.

Tags: