Chikkodi

सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकास : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ

Share

देशाच्या सर्वांगीण विकासात सहकार क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यापासून या क्षेत्राला नवी गती आणि ऊर्जा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी केले.

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे आयोजित ‘श्री बीरेश्वर को-ऑप सोसायटी’च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी ते बोलत होते. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली बीरेश्वर संस्था ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, बीरेश्वर संस्थेने सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी बीरेश्वर संस्था शेतकरी आणि गरीब घटकांना वेळेवर आर्थिक मदत पुरवून त्यांचा मोठा आधार बनल्याचे सांगितले.

कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी आशीर्वाद देताना अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा गौरव केला. प्रास्ताविक करताना आमदार शशिकला जोल्ले यांनी अगदी लहान स्वरूपात सुरू झालेली बीरेश्वर संस्था आज वटवृक्ष बनून लाखो कुटुंबांना आधार देत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला निडसोशीचे श्री पंचमशिवलिंगेश्वर स्वामीजी यांची दिव्य उपस्थिती लाभली. मंचावर संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले, समरजित घाटगे, आमदार दुर्योधन ऐहोळे, पी. राजीव, श्रीमंत पाटील, अरविंद देशपांडे, संजय पाटील, अनिल बेनके, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, अप्पासाहेब जोल्ले, जयकुमार खोत, राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी आभार मानले.

Tags: