
कर्नाटक सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करत राज्यातील सर्व ३१ जिल्ह्यांमध्ये ‘प्रजासेवा विभाग’ सुरू केला आहे. आता नागरिकांना सरकारी कामांसाठी कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, तर सरकारच थेट जनतेच्या दारात जाऊन समस्या सोडवणार आहे.

विजयनगर जिल्ह्यातील कूडलिगी येथे आमदार कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या नूतन विभागाचे अधिकृत उद्घाटन केले.

राज्यातील सर्व ३१ जिल्ह्यांमध्ये प्रजासेवा विभाग सुरू करण्यात आला आहे. जनतेने १४० जागांचे स्पष्ट बहुमत देऊन राज्याला एक नवी दिशा दिली असून, देशाला आदर्श ठरेल असे काम करण्याची संधी दिली आहे. हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून प्रशासनाचा दृष्टिकोन बदलणारा निर्णय आहे. आता जनतेने सरकारच्या दारात येण्याऐवजी सरकारनेच जनतेच्या दारात पोहोचले पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रशासनापासून दूर न ठेवता त्यांच्या जवळ जाऊन अडचणी ऐकून घेतल्या पाहिजेत.


आता राजेशाही संपून लोकशाही आली आहे. त्यामुळे मला ‘नाडाचा राजा’ (राज्याचा राजा) म्हणण्याऐवजी ‘प्रजासेवक’ म्हटले तर मला अधिक आनंद होईल. प्रत्येकाला विधानसौध, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा लोकप्रतिनिधींच्या कार्यालयापर्यंत येणे शक्य नसते. ही परिस्थिती बदलणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

या सोहळ्याला जिल्हा प्रभारी मंत्री बसवंतप्पा, स्थानिक आमदार श्रीनिवास, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चंद्रशेखर, विधानसभेचे उपाध्यक्ष मंकाळू वैद्य, राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, तुकाराम, प्रभा मल्लिकार्जुन यांच्यासह इतर अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




Recent Comments