राज्यातील जनतेच्या तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मोठा निर्णय घेतला असून, उद्यापासून देशासाठी आदर्श ठरणारा ‘प्रजासेवा विभाग’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.


शुक्रवारी बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम येथील संगमनाथ मंदिरात पूजा करून मुख्यमंत्र्यांनी घटप्रभा, मलप्रभा आणि कृष्णा नदीच्या संगमावर गंगापूजन केले. त्यानंतर त्यांनी कुडलसंगम येथील बसव व्यासपीठ सभागृहात बैठक घेतली.


पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या समस्यांसाठी शहरात भटकंती करावी लागू नये म्हणून ही नवी प्रशासकीय सुधारणा केली जात आहे. या अंतर्गत दरमहा दोन शनिवारी सर्व मंत्री अनिवार्यपणे विविध तालुक्यांना भेट देऊन जनतेच्या तक्रारी ऐकून घेतील. तसेच स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधी गावांमध्ये जाऊन प्रश्न सोडवतील.

कस्तुरीरंगन अहवालाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आक्षेप नोंदवण्यासाठी ६० दिवसांची मुदत असून, या गंभीर विषयावर विरोधी पक्षांनी प्रथम आपली भूमिका स्पष्ट करावी.

या प्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष मंकाळू वैद्य, मंत्री विजयानंद काशप्पनवर, खासदार डॉ. जी. सी. चंद्रशेखर, आमदार आर. बी. तिम्मापूर, जे. टी. पाटील, भीमसेन चिम्मणकट्टी आणि वीणा काशप्पनवर आदी उपस्थित होते.



Recent Comments