विजापूर येथील रवींद्रनाथ टागोर सीबीएसई शाळा आणि पीयू सायन्स कॉलेजमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शिक्षक दिन एकत्र साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषा साकारून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लहान मुलांनी कृष्ण आणि राधेची रूपे साकारून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून आणि पारंपरिक नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत रॅम्प वॉक करत कार्यक्रमात सहभाग घेतला. पालकांनी मुलांच्या या कलागुणांचे कौतुक केले.

या वेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनही साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा या वेळी गौरव करण्यात आला.
संस्कृती आणि परंपरेची ओळख पुढील पिढीला करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर


Recent Comments