Belagavi

बेळगावात उद्या मराठी साहित्याचे नांदी संमेलन

Share

बेळगावात उद्या, रविवारी (ता. १५) मराठी साहित्याचे एकदिवसीय नांदी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. खानापूर रस्त्यावरील मराठा मंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चार सत्रांमध्ये हे संमेलन होणार आहे.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, वाङ्मय चर्चा मंडळ, अर्पाडी महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर हे संमेलनाध्यक्ष असतील. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

पहिल्या सत्रात नाशिकचे विचारवंत डॉ. रमेश वरखेडे हे ‘मराठी भाषेसमोरील प्रश्न’ या विषयावर व्याख्यान देतील. मराठी विषयात ५० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या आणि विविध संस्थांवर कार्य केलेल्या डॉ. वरखेडे यांचे मार्गदर्शन या सत्रात लाभणार आहे.

दुसऱ्या सत्रात शिक्षणतज्ज्ञ व कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी आणि आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देतील. त्यांना २५ वर्षांहून अधिक अनुभव असून, त्यांनी १७ पुस्तकांचे लेखन केले आहे.

तिसऱ्या सत्रात ‘वेणुग्रामचा काव्यस्वर’ हा काव्यात्मक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत, कवी के. बी. निकुंभ आणि शंकर रामाणी यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी कवयित्री डॉ. मंगला वरखेडे असतील. मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि विविध विषयांवरील लेखन उल्लेखनीय आहे.

चौथ्या सत्रात मराठी शिकविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. रंगभूमी, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले योगेश सोमण हे या संमेलनाचे उद्घाटक आहेत. १९८७ पासून ते रंगभूमीवर कार्यरत असून, वक्ता व नाटककार म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Tags: