Vijayapura

बबलेश्वर तालुक्यात अनधिकृत पाणीचोरीची ३० प्रकरणे उघडकीस

Share

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यात मलघाण पश्चिम कालव्याच्या खालच्या भागातून सायफनद्वारे अनधिकृतपणे पाणी उपसा करण्याचे ३० प्रकार केबीजेएनएल अधिकाऱ्यांनी उघडकीस आणले असून, दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

एकूण ११८.६० किमी लांबीच्या मलघाण पश्चिम कालव्यात १०० किमीपर्यंतच पाणी पोहोचत होते. शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी जात नसल्याने शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनी समस्या मांडली होती. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता यक्कुंडी, होक्कुंडी, अर्जुनगी आणि हेब्बळट्टी परिसरात कालव्याच्या तळाला छिद्र पाडून पाईपद्वारे पाणी चोरले जात असल्याचे स्पष्ट झाले.

काही दिवसांपूर्वी कालव्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी अर्जुनगी येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या काही व्यक्तींनीच या कालव्यातून पाणीचोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात कालव्याच्या दुरुस्तीवेळी अधिकाऱ्यांनी अशा छिद्रांमध्ये काँक्रीट भरून ते बंद केले होते. मात्र, नुकतेच पाणी सोडल्यानंतर चोरट्यांनी ते पुन्हा फोडून अनधिकृतपणे पाणी घेतल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी अनधिकृतपणे पाणीचोरी करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे, अशी माहिती केबीजेएनएल बबलेश्वर विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र वाय. रूडगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Tags: