Vijayapura

मंत्री जमीर अहमद यांच्या समर्थनार्थ मंत्री एम. बी. पाटील मैदानात

Share

मंत्री जमीर अहमद खान यांच्या ध्वजारोहण सोहळ्यातील अनुपस्थितीवरून सुरू असलेल्या वादावर राज्याचे मंत्री एम. बी. पाटील यांनी जमीर यांची जोरदार बाजू घेतली आहे. जमीर यांच्या अनुपस्थितीचे विनाकारण राजकारण केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर खरमरीत टीका केली.

विजापूर येथे बोलताना एम. बी. पाटील म्हणाले की, मंत्री जमीर अहमद कार्यक्रमाला का उपस्थित राहू शकले नाहीत याचे नेमके कारण मला माहिती नाही. परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे ते अनुपस्थित राहिले असावेत आणि त्यांनी याची कल्पना मुख्यमंत्र्यांना नक्कीच दिली असेल.

जमीर अहमद यांच्या देशप्रेमावर आणि राष्ट्रनिष्ठेवर कुणीही शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगत एम. बी. पाटील यांनी भाजपच्या टीकेचा समाचार घेतला. स्वातंत्र्यलढ्यात भाजपचे काय योगदान होते? असा सवाल करत भाजपच्या एका तरी नेत्याने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याचे दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

‘हर घर तिरंगा’ अशी घोषणा देणाऱ्या भाजपने नागपूर येथील आरएसएसच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज का फडकवला नाही? असा प्रश्न उपस्थित करत आम्हाला भाजपकडून देशभक्ती शिकण्याची गरज नाही, असा घणाघाती टोला एम. बी. पाटील यांनी लगावला.

Tags: