विजापूर जिल्ह्यातील इंडि तालुक्यात एका निवृत्त शिक्षकाची भयंकर हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून अनैतिक संबंधाला विरोध केल्यानेच ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.


सिद्दप्पा बसप्पा अंजुटगी (वय ६२) असे मृत निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. ते दोन वर्षांपूर्वीच शिक्षक सेवेतून निवृत्त झाले होते. १६ ऑगस्ट रोजी इंडि तालुक्यातील चवडीहाळ रस्त्यावरील पुजारी वस्तीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यात आणि छातीवर गंभीर वार करून हत्या केल्यानंतर मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून आरोपी पसार झाले आहेत. या प्रकरणात मुलीसह तिघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्दप्पा यांची मुलगी प्रियांका हिच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यानंतर तिचे विजापूर येथील भीमाजी उर्फ संतोष गणपती शिंदे याच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. या संबंधांना सिद्दप्पा यांचा तीव्र विरोध होता आणि ते मुलीला समज देत असत. यावरून बाप-लेकीत सतत भांडणे होत असत. तसेच निवृत्तीचे पैसे इतरांना देण्यावरूनही कुटुंबात वाद सुरू होते. १५ ऑगस्टच्या रात्री ११ ते १६ ऑगस्टच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही हत्या झाली असण्याचा संशय आहे.
मुलगी प्रियांका, भीमाजी उर्फ संतोष आणि आणखी एका साथीदाराने कट रचून सिद्दप्पा यांची हत्या केली, मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळून गाडीतून आणून रस्त्याच्या कडेला फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
इंडि पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्येमागचे नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.


Recent Comments