मलप्रभा नदीतून डाव्या आणि उजव्या कालव्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील सवदत्तीजवळ शेकडो शेतकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखून भव्य आंदोलन केले. दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांवर राग व्यक्त करत शेतकऱ्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक करून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


मलप्रभा नदीतून डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी नवलगुंद, नरगुंद आणि सवदत्ती तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यातील सवदत्तीजवळ एकत्र येत मोठे आंदोलन केले. सिंधनूर-हेम्मडगा राज्य महामार्ग रोखून बसलेल्या शेतकऱ्यांनी शासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. रस्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक तासनतास पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

दहा दिवसांपूर्वी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी २ टीएमसी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक दिवस उलटूनही आश्वासन पूर्ण न करता जिल्हाधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. पिण्यासाठी पाणी नसल्याने गुरांचे हाल होत असून, तातडीने कालव्यात पाणी सोडलेच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
तसेच पाटबंधारे सल्लागार समिती (ICC) आणि संबंधित अधिकारी आपल्या समस्या ऐकून न घेता दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट पाहू, असे सांगत योग्य तो तोडगा न निघाल्यास आंदोलनाच्या ठिकाणीच स्वयंपाक करून शुक्रवारी धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा थेट इशारा शेतकऱ्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दिला आहे.


Recent Comments