Savadatti

सौंदत्ती डोंगर परिसरातील दुकानांवर प्रशासनाची धाड

Share

सौंदत्ती डोंगर परिसरातील दुकानांमध्ये भाविकांना कालबाह्य अन्न आणि अनधिकृत औषधांची विक्री केल्याप्रकरणी प्रशासनाने कारवाई केली आहे. मंदिर प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पाहणीमुळे नियमबाह्य पद्धतीने व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सौंदत्ती डोंगर परिसरातील दुकानांमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाच्या मुख्य अधिकारी प्रभावती फक्कीरपूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील किराणा दुकाने आणि पूजा साहित्य विक्री केंद्रांची अचानक पाहणी केली.

या पाहणी दरम्यान बहुतांश दुकानांमध्ये मुदतबाही शीतपेये, कालबाह्य खाद्यपदार्थांची पाकिटे आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य आढळून आले. विशेषतः कोणत्याही परवान्याशिवाय बंदी घातलेल्या औषधांची नियमबाह्य विक्री केली जात असल्याचे समोर आल्याने अधिकाऱ्यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले. दुकानांमधील अस्वच्छता आणि निकृष्ट साहित्य पाहून अधिकाऱ्यांनी दुकानदारांना चांगलेच तराटले.

लाखो भाविक येणाऱ्या या क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांना प्राधिकरनाने कठोर इशारा दिला आहे. परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या आणि अनधिकृतपणे व्यवहार करणाऱ्या अनेक दुकानांचा वीज आणि पाणीपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला आहे. आगामी काळात असा प्रकार आढळल्यास अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रभावती फक्कीरपूर यांनी स्पष्ट केले.

Tags: