Belagavi

दुष्काळ जाहीर करण्यासाठी भारतीय कृषक समाजाचे आंदोलन

Share

पावसाअभावी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भारतीय कृषक समाजाच्या वतीने पावसाचा अनुशेष आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रतिनिधींची तातडीने बैठक बोलावून राज्यात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी संघटनाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केली. तसेच राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.

याशिवाय पिकांच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करावे आणि शेतपंपांना दररोज सलग ७ तास ३-फेस वीजपुरवठा करावा, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

एफआरपी आणि एसआयपीनुसार उसाला योग्य दर निश्चित करावा, तसेच साखर कारखान्यांकडील थकीत रक्कम त्वरित शेतकऱ्यांना अदा करावी, अशी आक्रमक भूमिका भारतीय कृषक समाजाने घेतली आहे.

Tags: