राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण झाली असून, काँग्रेस हायकमांडने नवीन मंत्र्यांची यादी अंतिम केली आहे. विजापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सहा आमदार असतानाही दुसऱ्या मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

विजापूर जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी सहा जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. आधीपासूनच एम. बी. पाटील हे मंत्रिमंडळात असले तरी आणखी एका आमदाराला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अंतिम यादीत नाव नसल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये असंतोष दिसून येत आहे.

या वेळी माजी मंत्री शिवानंद पाटील, इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील आणि मुद्रेबिहाळचे आमदार सी. एस. नाडगौडा (अप्पाजी) यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत होती. परंतु प्रादेशिक व सामाजिक समीकरणांचा समतोल साधण्याच्या हायकमांडच्या निर्णयामुळे अखेर कोणाचीही वर्णी लागू शकली नाही.
मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर कर्नाटकचे प्रतिनिधित्व, मागास वर्ग, दलित, अल्पसंख्याक आणि महिलांच्या सहभागाचा विचार करून काँग्रेस वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये निरसता पसरली असून विजापूरवर पुन्हा अन्याय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments