Vijayapura

बस न थांबवल्याने अडवली एसटी, दारात हात अडकून विद्यार्थिनी जखमी

Share

विजापूर जिल्ह्यातील सारवाड गावात विद्यार्थ्यांसाठी एसटी बसची समस्या गंभीर बनली आहे. बस न थांबवल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी बस अडवली असता, चढताना दारात हात अडकून एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

सकाळी शाळेत जाण्यासाठी बसस्टॉपवर तासनतास थांबलेल्या विद्यार्थ्यांनी हात दाखवूनही अनेक सरकारी बसेस न थांबताच निघून जातात. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर बस अडवून विरोध दर्शवला.

या दरम्यान बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना खाकंबी वालीकार या विद्यार्थिनीचा हात कंडक्टरने दार बंद केल्यामुळे दारात अडकला आणि तिच्या हाताला दुखापत झाली.

जखमी विद्यार्थिनी कग्गोड येथील निवासी शाळेत अभ्यासासाठी जात होती. सारवाडहून रोज विजापूर शहर आणि परिसरातील शाळा-महाविद्यालयांत जाणारे शेकडो विद्यार्थी एसटीवरच अवलंबून आहेत. मात्र, जमखंडी व बबलेश्वर बाजूकडून येणाऱ्या बसेस विद्यार्थ्यांना पाहूनही थांबवत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेनंतर तरी प्रशासनाने जागृत होऊन शाळेच्या वेळेत बसेस अनिवार्यपणे थांबवाव्यात आणि विद्यार्थ्यांना सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर

Tags: