महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, अलमट्टी धरणातील पाण्याची आवक वाढल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि कृष्णा नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे अलमट्टी धरणात सोमवारी सकाळी १ लाख २५ हजार ८५५ क्युसेक पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. सध्या धरणात ५१८.९४ मीटर पाणीपातळी असून एकूण १११.९६९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणातून सध्या केपीसीएल आणि स्पिलवे गेट्सद्वारे एकूण १ लाख २८ हजार ३५० क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने १ लाख ५० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील पावसामुळे उत्तर कर्नाटकातील भीमा नदीलाही पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतः नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरांनाही नदीपात्रात सोडू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास दोन्ही नद्यांमधील पाण्याचा प्रवाह अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments