महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण पूर्ण भरले असून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कृष्णा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे प्रमुख धरणांपैकी एक असलेले राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरल्याने मध्यरात्रीपासूनच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

राधानगरी धरणाच्या ६ क्रमांकाच्या गेटमधून १४०० क्युसेक आणि वीज निर्मिती केंद्राद्वारे १४०० क्युसेक, असा एकूण २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी आणि निपाणी तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमधील आवक वाढली आहे. आजच्या अहवालानुसार या नद्यांच्या पातळीत सुमारे दोन फुटांची वाढ झाली आहे.
पाणी पात्रात दाखल होत असल्याने कल्लोळ बंधाऱ्याजवळ ९२ हजार क्युसेक आवक नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी अचानक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Recent Comments