गोटूर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपाससाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य भरपाई मिळत नसल्याचा आरोप करत, ३० जुलै रोजी चिक्कोडी येथे भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पूजारी यांनी दिली.

चिक्कोडी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या भरपाई धोरणावर नाराजी व्यक्त केली. गोटूर–विजापूर राष्ट्रीय महामार्गाचा बायपास चिक्कोडी शहरातून सुमारे सहा किलोमीटर जाणार आहे. मात्र, सरकारने प्रतिगुंठा ₹८० हजार आणि प्रतिएकर ₹३० लाख भरपाई निश्चित केली असून हा दर अवैज्ञानिक असल्याचा आरोप त्यांनी केला. बेंगळुरू परिसरात जास्त भरपाई देणारे सरकार चिक्कोडीतील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोप करत, भरपाईचा दर तातडीने सुधारावा, एकराला ₹४ ते ₹५ कोटी भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने प्रतिएकर ₹५० हजार मदत द्यावी, प्रलंबित उपसा सिंचन योजना तातडीने पूर्ण कराव्यात तसेच नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये, अशी मागणीही चुन्नप्पा पूजारी यांनी केली.
३० जुलैच्या आंदोलनस्थळी स्थानिक आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली.
पत्रकार परिषदेला शेतकरी नेते सत्यप्पा मल्लापूरे, मल्लप्पा अंगडी, मनोज मनगुळी, संजू चन्नवर, सहदेव चिम्मट, रवींद्र कुंबोज, कलगौडा पाटील आणि गोपाल कन्नुरे उपस्थित होते.


Recent Comments