State

नीट गैरव्यवहारावरून गृहमंत्र्यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Share

तुमकुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात राहुल गांधी यांनी आवाज उठवला असून काल दिल्लीत काँग्रेसकडून मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा परमेश्वर यांनी दिला. नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान मोदी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले असून आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तुमकुरु जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळायला हवे, अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करत परमेश्वर म्हणाले की, परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. यासंबंधी आपण पंतप्रधान मोदींना पत्र लिहून राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे, मात्र केंद्राकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. याशिवाय तुमकुरु येथे विमानतळ झाल्यास २० जिल्ह्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Tags: