Uncategorized

तिलारी-राकसकोप जलाशय जोडणीसाठी खासदार शेट्टर सकारात्मक

Share

बेळगाव शहराला भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, बेळगावच्या माजी नगरसेवकांच्या संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

आज बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बेळगाव शहरात दरवर्षी मे ते जुलै दरम्यान राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पाणीपातळी घटल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी चंदगड तालुक्यातील तिलारी जलाशय आणि राकसकोप जलाशय ‘राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा’अंतर्गत जोडण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवकांनी लावून धरली. तिलारी जलाशयात वीज निर्मितीनंतर मे ते जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध असते. हे पाणी राकसकोपमध्ये वळवल्यास बेळगाव शहर व परिसराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, तसेच मार्कंडेय नदीच्या पात्राद्वारे शेतीसाठीही याचा मोठा फायदा होईल, अशी माहिती माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सुंठकर यांनी दिली.

याविषयी बोलताना माजी नगरसेवक लतीफ खान पठाण म्हणाले की, या योजनेसाठी यापूर्वीही अनेक प्रयत्न झाले आहेत. तिलारीचे पाणी बेळगावला मिळण्यासाठी जिल्हा पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनातही मांडला जाईल. यामध्ये कोणताही भाषा किंवा सीमावाद न आणता बेळगाव शहरासाठी ही पाणी योजना लागू झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संसदेचे पावसाळी अधिवेशन संपताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासोबत तिलारी जलाशय परिसराची संयुक्त पाहणी करून पुढील आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या बैठकीला नेताजीराव जाधव, दीपक वाघेला, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी नगरसेवक उपस्थित होते.

Tags: