धारवाड येथील डॉक्टर हत्येप्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, पती-पत्नीमधील कौटुंबिक वादच या हत्येमागील मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, हा पूर्वनियोजित कट रचून केलेला खून असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. आरोपी महिला प्रियांका हिने पतीच्या हत्येनंतर स्वतःच्या मुलाला इन्सुलिनचे इंजेक्शन दिले आणि स्वतःही इन्सुलिन घेतल्याची कबुली दिली आहे. सध्या मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आरोपी प्रियांका हिच्यावरही उपचार सुरू असून, पुढील दोन दिवसांत तिची प्रकृती सुधारल्यानंतर अधिकृत जबाब नोंदवून घेतला जाईल, त्यानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.

प्राथमिक तपासादरम्यान घटना घडली तेव्हा घरात केवळ पती, पत्नी आणि मूल हे तिघेच हजर होते, तसेच बाहेरून कोणीही घरात प्रवेश केला नसल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. मृत डॉक्टरचे शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Recent Comments