Uncategorized

शासकीय योजनांच्या लाभासाठी मतदार नोंदणी आवश्यक :डॉ. अंजली निंबाळकर

Share

राज्य सरकारच्या एन.एस.आय.आर. नोंदणी मोहिमेचा लाभ घेत नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे निश्चित करावीत, असे आवाहन केपीसीसी कित्तूर कर्नाटक प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी बेळगावात केले.

बेळगाव येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अंजली निंबाळकर यांनी जिल्ह्यातील डिजिटल नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म क्रमांक ६ भरावा आणि स्थानिक पातळीवर अधिकारी उपलब्ध नसल्यास थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन करत या नोंदणीमुळे शासकीय योजनांचा लाभ मिळणे अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासोबतच राज्य सरकारच्या पाचही गॅरंटी योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारक आहे, असे सांगत डॉ. अंजली निंबाळकर यांनी नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.

या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: