राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यास आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केले आहे. बंगळुरू येथे बाबू जगजीवनराम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सरकार मतदानाबाबत जनजागृती करत असून इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकात गरिबांचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊ दिला जाणार नाही, असे शिवकुमार म्हणाले. मतदार यादी पुनर्रिक्षण (SIR) वादावर बोलताना, या प्रकरणावर आधीच न्यायालयात बाजू मांडण्यात आली असून गरज पडल्यास पुन्हा कोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजना देशासाठी आदर्श ठरल्या आहेत. महागाईने होरपळणाऱ्या जनतेसाठी आणलेल्या या योजनांची भाजप प्रणीत केंद्र सरकार आता इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये नक्कल करत असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आधीच पैसे जमा करत असल्याची टीका त्यांनी केली. लोकशाहीत प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क मिळावा यासाठी पहिल्यांदाच बूथ पातळीवर ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात येत असून निवडणूक आयोगाने या उपक्रमाचे कौतुक करावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिली.


Recent Comments