Vijayapura

अलमट्टी जलाशयातील पाणीपातळीत मोठी घसरण

Share

या वर्षी मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे विजयपूरसह उत्तर कर्नाटकच्या पाच जिल्ह्यांची जीवनवाहिनी असलेल्या अलमट्टी लाल बहादूर शास्त्री जलाशयातील पाणीपातळी चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे.

कृष्णा नदी बऱ्याच अंशी कोरडी पडल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. १२३ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या अलमट्टी जलाशयात सध्या वापरासाठी केवळ ३.१४ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. सामान्यतः जून अखेरीस या धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध असायचा, परंतु यंदा पावसाच्या तुटवड्यामुळे धरण रिकामे होत आले आहे.

विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांतील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी आणि शेती या धरणावर अवलंबून आहे. मात्र, धरणातील आवक पूर्णपणे मंदावल्याने पुढील काळात पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. शेतातील पिके सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत असून, महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होऊन धरणात पाणी कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर

Tags: