ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाला आता एक नवी दिशा मिळाली आहे. बेळगाव तालुक्यातील बेक्किनकेरी येथील सरकारी पूर्ण प्राथमिक शाळेत बालवाडी (एलकेजी आणि युकेजी) वर्ग अत्यंत उत्साहात सुरू करण्यात आले असून, चिमुरड्यांचे शाळेत दिमाखात स्वागत करण्यात आले आहे.
नूतन वर्गांमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पीडीओ जी. बी. हुब्बळीकर, एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर फडके, उपाध्यक्ष संध्या सावंत यांच्यासह विनोद भोगण, नामदेव धायगुंडे, चेतन भातकांडे, परशुराम भातकांडे आणि ज्ञानेश्वर धायगुंडे उपस्थित होते. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन प्रयत्न केल्यास प्रत्येक गाव ज्ञानाचे केंद्र बनेल आणि देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, असे आवाहन मान्यवरांनी संयुक्तपणे केले.
कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन करताना एन. जी. पाटील यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घर आणि शाळेमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. शालेय मुख्याध्यापिका तहसीलदार यांनी प्रास्ताविक केले, सुनीता जाधव यांनी सूत्रसंचालन केले आणि सुनीता दुंडगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी गावकऱ्यांनी दाखवलेला हा उत्साह इतर शाळांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.



Recent Comments