Khanapur

चापगाव येथील जल जीवन मिशन योजनेच्या चौकशीची मागणी

Share

खानापूर तालुक्यातील चापगाव येथील ‘जल जीवन मिशन’ पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.

सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही या योजनेतील अनेक कामे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे काम पूर्ण झाल्याचे गृहीत धरून संबंधित कंत्राटदाराला कोणतीही एनओसी देऊ नये आणि सद्यस्थितीत कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, असे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबाले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने अंदाजपत्रकानुसार सर्व कामे झाली आहेत की नाही, तसेच कामाचा दर्जा आणि तांत्रिक निकषांचे योग्य पालन झाले आहे का, याची सखोल तपासणी करून योग्य मूल्यमापन करावे. याशिवाय गावात विशेष ग्रामसभा आयोजित करून नागरिकांच्या तक्रारी, अभिप्राय आणि सूचना जाणून घ्याव्यात, अशी मागणी चापगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: