बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात असलेल्या असुंडी गावात ‘एमएसआयएल’ दारूचे दुकान बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले.


असुंडी गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. गावातील शांतता आणि आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

गेल्या काही दिवसांत गावातील तरुण आणि शाळकरी मुले दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. पुरुषांच्या दारूच्या व्यसनामुळे घर चालवणे कठीप झाल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. यापूर्वी अबकारी विभागाच्या उपायुक्तांना निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी दुकानासमोर ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनाची दखल घेत सवदत्ती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी शांत केले. प्रशासनाकडून योग्य कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, दुकान तातडीने बंद किंवा स्थलांतरित न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असुंडीच्या गावकऱ्यांनी दिला आहे.


Recent Comments