Dharwad

धारवाडमध्ये सुवर्णकाराकडून गोळीबार: विद्यार्थिनीसह तिघे जखमी

Share

धारवाड तालुक्यातील गरग गावात ४ वर्षांपूर्वी गहाण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांवर सुवर्णकाराने पिस्तूलमधून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका शाळकरी विद्यार्थिनीसह तिघे जण जखमी झाले आहेत.

जिरीगवाड येथील निंगप्पा होरकेरी आणि त्यांचा मुलगा सिद्धप्पा होरकेरी यांनी चार वर्षांपूर्वी गरग गावातील सुवर्णकार मौनेश पत्तार यांच्याकडे ४० ग्रॅम सोने ६० हजार रुपयांना गहाण ठेवले होते. निंगप्पा आणि सिद्धप्पा हे पैसे परत करून आपले सोने सोडवण्यासाठी आले होते. त्यांनी सोने परत देण्याची किंवा सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत देण्याची मागणी केली. मात्र, तुमचे सोने जप्त (मुदत बाह्य) झाले आहे, असे मौनेश याने सांगितले. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला आणि संतापलेल्या मौनेश पत्तार याने आपल्याकडील पिस्तूलमधून गोळीबार केला.

या गोळीबारात सिद्धप्पा आणि निंगप्पा यांच्या पोटात व पायाला गोळ्या लागल्या आहेत. याच दरम्यान शाळेतून घरी परतत असलेली श्रद्धा बैयप्पनवर ही १० वर्षांची विद्यार्थिनीही पायाला गोळी लागल्याने जखमी झाली. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली असून, गरग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: