Khanapur

खानापूरमध्ये मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण पूर्वतयारी बैठक

Share

खानापूरमध्ये संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक पार पडली. जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले.

खानापूर तालुका पंचायत सभागृहात आयोजित या आपत्ती पूर्वतयारी बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, तहसीलदार दुंडाप्पा कोमार आणि तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी रमेश मेत्री उपस्थित होते. आपत्ती काळात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहणे आवश्यक असल्याचे सांगत परशुराम दुडगुंटी यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रामुख्याने शिक्षण विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने अशा सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश परशुराम दुडगुंटी यांनी दिले.

खानापूर तालुक्यात मलप्रभा नदीसह इतर नद्यांना येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेता सर्व यंत्रणांनी २४ तास सतर्क राहावे, अशा सूचना परशुराम दुडगुंटी यांनी दिल्या. पूरपरिस्थितीत रस्ते, शाळांच्या इमारतींवर लक्ष ठेवणे, ग्रामपंचायतींनी गटारे स्वच्छ राखणे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आपत्तीमध्ये घरांची पडझड झाल्यास १०० टक्के नुकसान भरपाई मिळवून देणे, जनावरांचे लसीकरण, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, धोकादायक झाडांच्या फांद्या हटवणे आणि आरोग्य विभागाने साथीच्या आजारांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही अधिकाऱ्याने आपत्ती काळात मुख्यालय सोडू नये, असेही परशुराम दुडगुंटी यांनी बजावले.

या महत्त्वाच्या बैठकीची माहिती तालुका प्रशासनाकडून पत्रकारांना देण्यात आली नव्हती. दरवर्षी या बैठकीला प्रसारमाध्यमांना आमंत्रित केले जाते, मात्र यंदा अधिकाऱ्यांना याचा विसर पडल्याने बैठकीला एकही पत्रकार उपस्थित नव्हता. या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मनोहर दादमी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश किवडसनावर, हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता प्रवीण बरगाले यांच्यासह ५१ ग्रामपंचायतींचे विकास अधिकारी उपस्थित होते.

Tags: