उत्तर कर्नाटकात हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून एकत्रितपणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून धारवाडमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने हिंदू-मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांची शांतता बैठक मंगळवारी पार पडली.


धारवाडमधील एसीपी कार्यालयात एसीपी प्रशांत सिद्धनगौडर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत धारवाड पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख नेते व नागरिक उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांच्या सूचना आणि मागण्या ऐकून घेतल्यानंतर एसीपी प्रशांत सिद्धनगौडर यांनी मार्गदर्शन केले. धारवाडमध्ये दोन्ही समुदाय ऐतिहासिक काळापासून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि सलोख्याने मोहरम साजरा करत आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

यंदाचा मोहरम सण देखील पूर्वीप्रमाणेच शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात दोन्ही समुदायांनी साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. शांततापूर्ण सण साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील. कोणत्याही अनुचित घटनांना थारा न देता आदर्श पद्धतीने सण साजरा करून धारवाडने इतर जिल्ह्यांसमोर एक आदर्श ठेवावा, असे आवाहन प्रशांत सिद्धनगौडर यांनी केले. तसेच जर कोणी कायदा हातात घेण्याचा किंवा नियम मोडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशांत सिद्धनगौडर यांनी दोन्ही समाजातील प्रमुख नेत्यांना दिला.


Recent Comments