बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा गेल्या ८० वर्षांपासूनचा बसचा प्रश्न अखेर सुटला आहे. . दलित संघर्ष समिती आणि गावकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या ४-५ दिवसांत नवीन बस सेवा सुरू केली. यामुळे गावकऱ्यांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.


स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली तरीही मुडेवाडी, कोथगुडे, गणेबैल, हत्तरगुंजी आणि डुक्करवाडी या गावांत बस नसल्याने येथील विद्यार्थी, वृद्ध आणि शेतकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत होती. नुकतेच खानापूर आगार व्यवस्थापक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत अवघ्या काही दिवसांत ही सेवा सुरू केली.


गावकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल खानापूर आगार व्यवस्थापक संतोष बेनकनकोप्प आणि दलित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांनी शाल परिधान करून सत्कार केला.
या वेळी बोलताना गावकऱ्यांनी, गेल्या ८० वर्षांपासून बस नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका ग्रामस्थाने, लोकप्रतिनिधी आणि समितीच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न सुटल्याचे सांगत गावकऱ्यांना या सकाळ-संध्याकाळ सुरू झालेल्या बस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत उपाध्यक्ष उज्वला कुंभार, सदस्य रवी मादर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments