धारवाड मध्यवर्ती कारागृहातील निलंबित जेलर सिद्धरामप्पा वड्डर यांनी शासकीय निवासस्थानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन महिन्यांपूर्वी कर्तव्यात कसूर केल्याप्रकर्णी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.


धारवाड शहरातील नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या कारागृहाच्या शासकीय निवासस्थानात ३३ वर्षीय जेलर सिद्धरामप्पा वड्डर यांचा मृतदेह आढळून आला. दोन महिन्यांपूर्वी कारागृहातील एका प्रकरणावरून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची म्हैसूर कारागृहात बदली करण्यात आली होती, मात्र ते अद्याप तिथे कर्तव्यावर हजर झाले नव्हते. शुक्रवारी सकाळी त्यांची पत्नी आणि दोन मुले बाहेर गावी गेलेली असताना, घरात कोणीही नसताना सिद्धरामप्पा यांनी पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

सिद्धरामप्पा यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी निवासस्थानाकडे धाव घेतली. प्रशासकीय कारवाई आणि बदलीमुळे ते प्रचंड मानसिक दडपणाखाली होते, अशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपासानंतरच ते समोर येईल. धारवाड उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.


Recent Comments