Khanapur

खानापूर मध्ये घनदाट जंगलात वाट चुकलेल्या वृद्धाचा वनविभागाकडून जीवदान

Share

गुरे चरण्यासाठी गेल्यानंतर जंगलात वाट चुकून बेपत्ता झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून वृद्धाचे प्राण वाचवल्यामुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

खानापूर तालुक्यातील हेम्मडगा येथील हेमंत मादार हे शेतात गुरे चरण्यासाठी गेले असताना जंगलात वाट चुकल्याने बेपत्ता झाले होते. संध्याकाळी केवळ गुरेच घरी परतल्यामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांनी भीमगड वन्यजीव विभागाचे आरएफओ नदाफ यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून आरएफओ नदाफ यांनी तात्काळ एसीएफ बसवराज वाळद यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी आणि गावकऱ्यांची पाच विशेष पथके तयार केली. हिंस्र श्वापदांची भीती असलेल्या या जंगलात रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सलग दहा तास शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर या वृद्धाचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे घरी आणण्यात यश आले, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Tags: