विजापूर जिल्ह्यातील चडचण येथील एसबीआय बँकेवर पडलेल्या दरोड्यातील सोने आठ महिने उलटूनही परत न मिळाल्याने संतप्त ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यांना रात्री अकरा वाजेपर्यंत आत कोंडून ठेवत उग्र आंदोलन केले.


गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी या बँकेवर धाडसी दरोडा पडला होता, ज्यामध्ये ग्राहकांचे कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. प्रशासनाने वारंवार दिलेल्या मुदती संपल्याने आक्रमक झालेल्या ग्राहकांनी आजच्या बाजारभावानुसार संपूर्ण रक्कम किंवा मूळ सोने त्वरित देण्याची मागणी लावून धरली.

या आंदोलनादरम्यान बँक अधिकारी आणि ग्राहकांमध्ये भरपाईच्या अटींवरून तीव्र मतभेद पाहायला मिळाले. पोलिसांनी आरोपींना गजाआड केले असले तरी बँकेने अद्याप भरपाई न दिल्याने अखेर ग्राहकांनी बँकेला टाळे ठोकून प्रशासनाला वेठीस धरले. बँक प्रशासन केवळ सोन्याच्या निव्वळ वजनानुसार भरपाई देण्यावर ठाम होते, तर ग्राहकांनी गहाण ठेवलेले मूळ दागिनेच परत मिळण्याचा आग्रह धरला. शेवटी चडचणचे पीएसआय सोमेश गेज्जी आणि सीपीआय परशुराम मनगुळी यांनी मध्यस्थी करून १५ जूनपर्यंत ग्राहकांना योग्य भरपाई देण्याचे आश्वासन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळवून दिले.
या महत्त्वाच्या बैठकीला एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक विकास भगोत्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद वाली यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या कारवाईनंतर आता बँकेकडून न्याय मिळण्याच्या आशेने ग्राहकांनी १५ जूनच्या मुदतीकडे डोळे लावले असून, हा शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.


Recent Comments