धारवाडमधील युथ काँग्रेस सरचिटणीस फैयाज पठाण हत्या प्रकरणातील एका आरोपीचा रुग्णालयात मोबाईल वापरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस बंदोबस्तात असताना घडलेल्या या प्रकारामुळे धारवाड कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धारवाडमध्ये फैयाज पठाण यांची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एकूण १३ आरोपींना अटक केली असून, त्यातील आरोपी क्रमांक १० मैनुद्दीन नदाफ याला उपचारासाठी हुबळीमधील ‘किम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान तो मोबाईल वापरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये मैनुद्दीन कानात बड्स लावून बोलताना आणि त्याच्या बेडवर मद्याची बाटली दिसत आहे. पोलीस पहाऱ्यात असतानाही एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला या वस्तू कशा मिळाल्या, याबद्दल आता सार्वजनिक पातळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या हत्येच्या कटात संशयित असलेले काँग्रेस नेते इस्माईल तमाटगार अटकेच्या भीतीने परदेशात पसार झाले आहेत. परदेशात असलेल्या याच संशयिताचा नातेवाईक असलेल्या मैनुद्दीनला रुग्णालयात मिळत असलेल्या या सवलतींमुळे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे.


Recent Comments