गेल्या चाळीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत असून एकदा तरी राज्याचा कृषी मंत्री होण्याची आपली इच्छा आहे, असे स्पष्ट करत नवलगुंदचे आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी आपली मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा उघड केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी यापूर्वीच आपली ही इच्छा बोलून दाखवली आहे.

धारवाडमधील नवलगुंद मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या एसआयआर संदर्भात आयोजित बीएलए कार्यशाळेत भाग घेतल्यानंतर आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि पक्षाच्या हायकमांडची भेट घेऊन मंत्रिमंडळात संधी देण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला एकदा संधी मिळाल्यास सर्वांना आवडेल असे काम करून दाखवू आणि प्रामुख्याने कृषी खात्याची मागणी केली असली, तरी इतर कोणतेही खाते दिले तरी ते सक्षमपणे सांभाळू, अशी प्रतिक्रिया आमदार एन. एच. कोनरेड्डी यांनी दिली. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित केलेली पक्षाची कार्यशाळा अत्यंत यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments