Hukkeri

बेळगाव जिल्ह्यासाठी आणखी एका मंत्रिपदाची आवश्यकता

Share

बेळगाव जिल्ह्याचा विस्तार पाहता येथे आणखी एका मंत्रिपदाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. हुक्केरी तालुका पंचायत सभागृहात आयोजित आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हुक्केरी येथे जनतेच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि विविध शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, प्रदेश काँग्रेस (केपीसीसी) अध्यक्षपदासाठी आपण उत्सुक होतो, मात्र ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमामुळे मंत्रिपदावर कायम राहिल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्याविरोधात अपप्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तो विषय आता संपला असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्ह्यातील आणखी चार ते पाच ज्येष्ठ आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, मात्र जिल्ह्याचा विचार करता आणखी एका मंत्रिपदाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली.

या बैठकीपूर्वी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी मंत्र्यांचे स्वागत केले. या प्रसंगी तहसीलदार बलराम कट्टीमनी, तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद, गॅरंटी समितीचे अध्यक्ष शानुल तहसीलदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: