बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिरेपडसलगी गावात कृष्णा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध माती उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महसूल आणि खाण विभाग गप्प असला, तरी एका धाडसी शेतकरी महिलेने रस्त्यावर उतरून अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखल्याने खळबळ उडाली आहे.

जमखंडी तालुक्यातील हिरेपडसलगी गावाजवळील कृष्णा नदीच्या पूरग्रस्त आणि पुनर्वसन क्षेत्रात सध्या माती माफिया सक्रिय झाले आहेत. नदीतील पाण्याची पातळी कमी होताच, तस्करांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे माती उत्खनन करून वाहतूक सुरू केली आहे. कोणतीही परवानगी नसताना शासकीय आणि संपादित जमिनीवर हा प्रकार सुरू आहे.

या अवैध धंद्याकडे खाण आणि भूविज्ञान विभाग तसेच तालुका प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आज सकाळी बेकायदेशीरपणे माती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका स्थानिक शेतकरी महिलेने रस्त्याच्या मध्यभागीच अडवले आणि चालकांसह मालकाला चांगलेच धारेवर धरले. या धाडसी कारवाईनंतर आता तरी जिल्हा प्रशासनाने जागे व्हावे आणि या माती माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.



Recent Comments