State

पक्षाध्यक्ष असणाराच मुख्यमंत्री होतो असा नियम नाही

Share

राज्यात केपीसीसीचे नूतन अध्यक्षांची नियुक्ती आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

आगामी २०२८ च्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भाष्य करताना, मुख्यमंत्री होण्यासाठी पक्षाचे अध्यक्षपदच हवे असे काही बंधन नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सिद्धरामय्या यांचे उदाहरण दिले आहे.

बेंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पक्षात ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले. डी. के. शिवकुमार पक्षाध्यक्ष असतानाची परिस्थिती वेगळी होती. आधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे केपीसीसीचे अध्यक्षपद दिले जात होते आणि अंतिम निर्णय हायकमांडवर सोडला जात होता, मात्र आता मंत्रिपद देण्यात आले आहे. २०२८ मध्ये मुख्यमंत्री कोण होणार, हा त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असलेला निर्णय आहे. पक्षाचा अध्यक्ष असलेलाच मुख्यमंत्री होतो असे अजिबात नाही. सिद्धरामय्या हे अध्यक्ष नसतानाही मुख्यमंत्री झाले होते, याकडे सतीश जारकीहोळी यांनी लक्ष वेधले.

पक्षात जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतात, तेव्हा त्या सोडवण्यासाठी सर्वांनाच एकत्र यावे लागते आणि डी. के. शिवकुमार यांनीही तेच केले आहे. आपण अध्यक्षपदावर असलो किंवा नसलो तरी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बी. के. हरिप्रसाद मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत का, या प्रश्नावर ते अत्यंत ज्येष्ठ नेते असून त्यात काही वावगे नाही, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली. पक्षात सध्या सुरू असलेले सर्व मतभेद लवकरच मिटतील आणि आगामी काळात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळातील उर्वरित जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि हायकमांड मिळून यावर योग्य तो तोडगा काढतील, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

केपीसीसीचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर बी. के. हरिप्रसाद यांनी बेंगळुरू येथील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नूतन अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: