Belagavi

बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर

Share

बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील बस स्थानके, पदपथ आणि उद्यानांमधील अस्वच्छतेबाबत तसेच मान्सूनच्या पार्श्वभूमीवर निराश्रित कुटुंबांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम हरिविजय मंचालवार यांनी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला संयुक्त कारवाईचे आवाहन केले आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम हरिविजय मंचालवार यांच्या नेतृत्वाखाली आज पहाटे ६ वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्टेशन बस स्थानक, गोगटे सर्कल आणि मिलिटरी महादेव मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी अनेक कुटुंबे तेथे तात्पुरत्या आश्रयाला असल्याचे आणि कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे आढळून आले. यामुळे खानापूर व इतर गावांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असून स्वच्छता मोहिमेतही अडथळे येत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी आश्रयाला असलेले हे लोक आर्थिक संकट आणि बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात येथील महिला आणि मुलांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा पोलीस आयुक्त कार्यालय व महापालिकेने संयुक्त पाहणी करावी, अशी विनंती सुदाम हरिविजय मंचालवार यांनी केली आहे. या वंचित घटकांना शासकीय निवारा केंद्रात किंवा तात्पुरत्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे आणि सामाजिक संस्थांनीही या पुनर्वसन कार्यात पुढे यावे, असे आवाहन सुदाम हरिविजय मंचालवार यांनी केले आहे.

Tags: