खानापूर तालुका पंचायत कार्यालयात आयोजित पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणी प्राधिकरण बैठकीत तीव्र गोंधळ पाहायला मिळाला. शिधावाटपातील गैरव्यवहार आणि अपात्र लोकांना बीपीएल कार्ड वाटप केल्याच्या मुद्द्यावरून प्राधिकरणाच्या सदस्या दीपा पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खानापूर तालुका पंचायत कार्यालयात प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणी प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत बिडी भागातील शिधावाटपातील गैरव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सदस्या दीपा पाटील यांनी प्रत्येक ५० किलो तांदळाच्या वाटपामागे ३ ते ४ किलो तांदूळ कमी दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला. पुरवठाच असा होत असल्याचे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘जाब विचारल्यावर तुम्हाला काय हवे? असे विचारले जाते, याचा अर्थ काय?’ असे प्रश्न विचारत त्यांनी अन्न पुरवठा विभागाच्या यमकनमरडी येथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आले नाही.

यावेळी गरीब कुटुंबांचे बीपीएल कार्ड श्रीमंतांना मिळत असल्याबद्दल दीपा पाटील यांनी संताप व्यक्त केला. चारचाकी वाहन आणि स्वतःची इमारत असणाऱ्या श्रीमंत लोकांना बीपीएल कार्ड देण्यात आले असून, खऱ्या गरिबांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. या महिन्यात दोनदा थम्ब इंप्रेशन थांबवण्याबाबत योग्य माहिती न दिल्याने त्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व प्राधिकरणाचे सचिव रमेश मेत्री यांना जाब विचारला. बैठकीत सदस्य इसाक खान पठाण, बाबू हत्तरवाड यांच्यासह इतर सदस्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. विविध विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.



Recent Comments