कर्नाटकातील राजकीय घडामोडीत नूतन मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळाची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये बागलकोट जिल्ह्याला स्थान मिळालेले नाही. पहिल्या यादीत मंत्रिपद न मिळाल्याने जिल्ह्यातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत बागलकोट जिल्ह्याला स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील जनतेमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पहिल्या यादीतच मंत्रिपद मिळण्याची खात्री असलेल्या ज्येष्ठ आमदार आर बी तिम्मापूर यांना हायकमांडने धक्का दिला आहे. सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या तिम्मापूर यांच्या समर्थकांमध्ये यामुळे चिंता वाढली असून, दलित कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी समर्थकांनी हायकमांड पातळीवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यातील इतर दोन प्रभावशाली आमदार विजयानंद काशप्पनवर आणि जे टी पाटील यांच्या मंत्रिपदाच्या आशेला सध्या तरी खीळ बसली आहे. काशप्पनवर हे पंचमसाली कोट्यातून प्रयत्न करत आहेत, तर जे टी पाटील हे समाज घटकाच्या आधारावर मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बागलकोटमधील अप्पर कृष्णा (यूकेपी) प्रकल्पातील पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी यंदा मंत्रिपद मिळणे आवश्यक होते, अशी भूमिका स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री डी के शिवकुमार हे दुसऱ्या यादीत तरी बागलकोट जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments