विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात जमीन वादातून झालेल्या ६ जणांच्या सामूहिक हत्याकांड प्रकरणाचा छडा लावून पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यामधील गोविंदपूर गावात २९ मे रोजी जमीन वादातून ६ जणांची हत्या करण्यात आली होती. भीमा नदीच्या तीरावरील २५ एकर जमिनीच्या वादातून गोविंदपूर येथील गोळगी कुटुंबाने चडचणमधील नामांकित निराळे कुटुंबातील ५ सदस्य आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीची हत्या केली. तडजोड करण्याच्या बहाण्याने त्यांना शेतात बोलावून डोळ्यात मिरची पूड टाकून, दुहेरी बारच्या बंदुकीने आणि तलवारीने ही हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपी शेजारील महाराष्ट्रातील अक्कलकोट आणि कुडला परिसरात लपून बसले होते. पोलिसांनी ८ विशेष पथके तयार करून १२ आरोपींना अटक केली असून आज त्यांना इंडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या प्रकरणात २० हून अधिक जणांचा समावेश असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या १२ आरोपींपैकी तीन जणांची नावे आधीच एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत. या हत्येचा कट रचणाऱ्या गोळगी कुटुंबातील अप्पूगौडा पाटील उर्फ गोळगी आणि कल्लाणगौडा यांनी कलबुरगी जिल्ह्यातील भीमा नदीच्या भागातून आपल्या नातेवाईक मुलांना बोलावून घेतले होते. त्यांनी शेतात आधीच मिरची पूड आणि तलवारी लपवून ठेवल्या होत्या. वादादरम्यान कल्लाणगौडा याने आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळ्या झाडून निराळे कुटुंबातील चंद्रकांत यांची मुले समर्थ आणि राहुल यांची हत्या केली. त्यानंतर इतरांनी मिळून दुंडप्पा निराळे, शिवपुत्र, चंद्रकांत आणि शब्बीर अत्तार यांच्यावर ऊस कापण्याच्या कोयत्याने वार करून त्यांना संपवले. मृत चंद्रकांत निराळे आणि संशयित अप्पूगौडा हे पूर्वीचे जिवलग मित्र होते, मात्र २५ एकर जमिनीसाठी अप्पूगौडाने आपल्या मित्राच्या कुटुंबाचा बळी घेतल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात निराळे कुटुंबाने १२ जणांविरोधात तक्रार दाखल केली असली, तरी गोळगी कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांसह २० हून अधिक जणांनी मिळून हे हत्याकांड घडवल्याचा संशय असून पोलिसांचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे.


Recent Comments