Khanapur

खानापूरमध्ये बेकायदेशीर बंदूक निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त :१३ आरोपींना अटक

Share

खानापूर तालुक्यातील कातगाळी गावामध्ये बेकायदेशीरपणे गावठी बंदुकांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीचा खानापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून १३ आरोपींना अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी बेळगावमधील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांच्या या कारवाईमुळे खानापूरमधील बेकायदेशीर शस्त्र निर्मितीचे जाळे उघडकीस आले आहे.

खानापूर पोलिसांच्या पथकाने कातगाळी गावामध्ये धाड टाकून बेकायदेशीर बंदूक निर्मितीचा कारखाना शोधून काढला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले की, मारुती श्रीकांत सुतार हा संशयित २०२४ पासून आपल्या घरामध्येच गावठी बंदुका तयार करून त्यांची विक्री करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून आणि त्याने विकलेल्या ग्राहकांकडून एकूण ९ गावठी बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती के. रामराजन यांनी दिली.

या बेकायदेशीर व्यवसायाला आर्थिक मदत पुरवणाऱ्या आणि बंदुकीचे सुटे भाग तसेच दारूगोळा पुरवणाऱ्या इतर साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये बंदुकीच्या बॅरलचे वेल्डिंग करणाऱ्या एका कारागिराचाही समावेश आहे. या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचे के. रामराजन यांनी स्पष्ट केले.

पोलीस कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून ट्रिगर, बंदुकीचे सुटे भाग, दारूगोळा, शिशाच्या गोळ्या आणि जिवंत काडतुसे यांसह मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती के. रामराजन नी दिली.

Tags: