हुक्केरीमध्ये बकरी ईद सण अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने हुक्केरीमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोख्याचे उत्तम दर्शन घडवले.

बकरी ईद हा हिंदू-मुस्लिम बांधवांच्या सलोख्याचा आणि त्यागाचा सण असल्याचे हुक्केरी अकरा जमातचे अध्यक्ष सलीम नदाफ यांनी म्हटले. हुक्केरीमधील ईदगाह मैदानावर आयोजित सामूहिक प्रार्थनेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. इस्लाम धर्मामध्ये पैगंबर इब्राहिम यांनी दिलेल्या त्यागाच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा केला जातो. मानवाने आपल्यातील अहंकार सोडून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा, हाच या सणाचा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

हुक्केरी शहराबाहेरील ईदगाह मैदानावर अकरा जमात आणि अंजुमन कमिटीच्या सदस्यांसह हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंजुमन कमिटीचे अध्यक्ष व अकरा जमातचे अध्यक्ष सलीम नदाफ आणि इरशाद मोकाशी यांनी प्रतिक्रिया दिली. हुक्केरीमध्ये सर्व धर्मीयांनी एकत्र येत सलोख्याने हा सण साजरा केला आहे. देशात चांगला पाऊस पडू दे आणि सर्वांना सुख-शांती लाभू दे, अशी प्रार्थना अल्लाहकडे केल्याचे सलीम नदाफ आणि इरशाद मोकाशी यांनी सांगितले.
या पवित्र सणाच्या निमित्ताने हुक्केरीमधील जुम्मा मशीद, मरकस, जामा मशीद, मोहम्मदिया मशीद आणि गजबारवाडी मशीद येथेही सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. नमाज पठणानंतर नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि गोड जेवणाचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी शब्बीर सनदी, इरशाद मोकाशी, नाशीर सुतार, जी. एस. अम्मणगी, दस्तगीर काझी, अश्रफ खानजादे, डी. आर. काझी, अमानुल्ला काझी, राजू मुजावर आणि आलम मकानदार यांच्यासह अंजुमन कमिटी व अकरा जमातचे सदस्य आणि विविध मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments