बैलहोंगल येथील सरकारी रुग्णालयात सहा फुटी नाग आढळल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक सर्पमित्राने या नागाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

बैलहोंगल शहरातील सरकारी रुग्णालयात अचानक एक मोठा नाग प्रगटल्याने एकच गोंधळ उडाला. रुग्णालयाच्या छतावर सुमारे ६ फूट लांबीचा नाग फणा काढून बसल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली होती.

रुग्णालयात नाग असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रसिद्ध सर्पमित्र मल्लिकार्जुन गाणीगेर यांना पाचारण केले. मल्लिकार्जुन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक या नागाला सुरक्षितपणे पकडले.
मल्लिकार्जुन यांनी नागाला पकडल्यानंतर त्याला कोणतीही इजा न करता जवळच्या दाट जंगल परिसरात नेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले. नाग जंगलात गेल्यानंतर रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून रुग्णालयातील वातावरण पूर्ववत झाले आहे.


Recent Comments